➖➖➖➖➖➖➖➖
मातृभाषेचं मानवी जीवनातील स्थान -
➖➖➖➖➖➖➖➖
© प्रा. मनोहर राईलकर
कोणतीही भाषा ज्ञानभाषा होऊ शकते यासाठी प्रा. राईलकर यांनी त्यांच्या विद्यार्थ्याला दिलेले ज्ञानेश्वरीचे उदाहरण, आणि दोघांच्यात झालेला संवाद!
सर - वेदांतल किंवा उपनिषदातल महान तत्वज्ञान गीतारहस्याप्रमाणं पंडिती मराठीत नव्हे, तर अगदी सामान्यांना समाजातल्या अडाण्यांनासुद्धा सहज कळेल. अशा बोलीभाषेत ज्ञानदेवांनी आणलं. अकराव्या अध्यायात ते काय म्हणतात? हा तत्वज्ञानाचा प्रवाह संस्कृतच्या कठीण किंवा टणक किनारे असलेल्या नदीतून वहात होता. त्यामुळं त्यात उतरून सामान्यांना स्नान करता येत नव्हतं. ते किनारे तोडून निवृत्तीदेवांनी (हा ज्ञानदेवांचा विनय!) मराठी पायऱ्या बांधल्या. आता ह्या प्रवाहात कोणीही श्रद्धेनं स्नान करून विश्वरूपदर्शन घ्यावं आणि संसारातून म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त व्हावं' इतकं सोपं तत्वज्ञान आहे हे.
तीरे संस्कृताची गहने|
तोडोनी मऱ्हाठिया शब्द्सोपाने|
रचिली धर्मनिधाने|निवृत्तीदेवे|
म्हणौनी भलतेणे एथ सद्भावे नाहावे|प्रयागमाधव विश्वरूप पहावे |येतुलेनी संसारासी द्यावे|तिलोदक||
(दांडेकर प्रत ९, १०||)
सर - याचा समाजाला काय लाभ झाला तुम्हाला कळाला का?
वि - नाही बुवा. नाही कळला. सांगा ना.
सर - ज्ञानेश्वरांनंतर कित्येक जातीत संत निर्माण झाले. गोरा कुंभार, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार, नामदेवांची दासी जनाबाई, चोखा मेळा, तुकाराममहाराज वाणी, आणि आणखी किती कितीतरी असतील. अलीकडची उदाहरणं म्हणजे बहिणाबाई, गाडगेमहाराज?' त्यांनी मान डोलावली..
आपल्याला माहित नाहीत अशी आणखीही कित्येक संतमंडळी असतील. तुकाराम महाराजांचे सहकारी, निळोबा, जगनाडे. असं कसं झालं? एकदम संतांची मांदियाळीच कशी झाली हो? त्यांचा प्रश्नार्थी चेहरा पाहून मीच पुढ बोलू लागलो. मी सांगतो.
मुळात ते तत्वज्ञान समजण्याची त्यांची बौद्धिक, मानसिक पात्रता असणारच. पण ते सार तत्वज्ञान होतं, त्यांना दुर्बोध असलेल्या संस्कृतात, त्यांनाच का? तुम्हालाही संस्कृत दुर्बोध वाटलं ना ? तर त्याचं काय ? बरोबर ?
वि - आता आला लक्षात मुद्दा तुमचा
सर - श्रोते होते सामान्य अडाणी अशिक्षित शेतकरी कामकरी. पण सर्वांनीच शिकावं, किंवा मूळ संस्कृतातूनच ते ज्ञान मिळवाव, ते तत्वज्ञान शिकण्याकरता संस्कृतला पर्याय नाही. असा वेडगळ आग्रह ज्ञानेश्वरांनी धरला नाही. तर संस्कृतातलच महान तत्वज्ञान त्यांनी मराठीत, तेही गीतारहस्याप्रमाणं ग्रांथिक मराठीतसुद्धा नव्हे. सामन्यांच्या अडाण्यांच्या. अगदी ठार अशिक्षितांच्या बोली भाषेत आणून ओतलं. दृष्टांतसुद्धा श्रोत्यांच्या दैनंदिन जीवनातलेच आणि जिव्हाळ्याचे दिले. तेव्हा ते तत्वज्ञान त्या लोकांना अवघड वाटलं नाही. इतकंच नव्हे तर त्या संतानीही पुढ स्वरचित ओव्या अभंगांमधून ते आणखी सोपं केलं आणि आपापल्या समाजात पुढंही नेलं.
तुकाराममहाराजांनी ज्ञानेश्वरीची हजारावर पारायणं केली होती, अस अभ्यासक सांगतात. त्यांनी तर मोठ्या आत्मविश्वासान म्हटलं,
वेदाचा तो अर्थ| आम्हासची ठावा| येरोनी वाहावा| भार भार वाहिला.
वेदांच खरं मर्म आम्हालाच कळल आहे. कशामुळ?
मग इंग्रजीत उपलब्ध असलेलं आधुनिक ज्ञान, असंच, साध्यासोप्या अगदी बोली मराठीतसुद्धा आणलं, तर आपल्या खेड्या-पाड्यांतल्या सामान्यजनांनासुद्धा सहस कळेल. मग तेही, जगाचे डोळे दिपवणारी चमकदार कामगिरी ते करणात नाहीत, असं आपण का समजावं? तेही इतके मोठे शोध लावतील कि इतर भाषांतही त्यांचा अनुवाद व्हावा. असंही होणार नाही, असं का मानावं ? खर तर तसं समजण हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान नव्हे का?
खरं तर ज्ञानदेवांच्या ह्या अफाट कार्याची जाणीव नामदेवांना जितकी अचूक होती, तितकी फारच थोड्यांना असावी.
वि - म्हणजे ?
सर - ज्ञानदेवांच महत्व सांगणारा नामदेवांचा अभंग आहे. सर्वच्या सर्व अभंग सांगण्याचं हे स्थळ नव्हे. आवश्यक तेवढी कडवी सांगतो. ते म्हणतात, त्यांनी वेद (निगम) सर्वांना उलगडून सांगितले.
ज्ञानेश्वरी हा गीतेचा अलंकार आहे. आणि तिच्या माध्यमातून त्यांनी ब्रह्मानंद सर्वांना दाखवला, मिळवून दिला.
ज्ञानराज माझी| योग्यांची माऊली|
जेणे निगमवल्ली | प्रकट केली ||१||
गीता अळंकार |नाम ज्ञानेश्वरी|
ब्रह्मानंद लहरी|प्रकट केली ||२||
पण तेवढ्यावर नामदेव महाराज थांबत नाहीत. ते पूढ म्हणतात,
छप्पन्न भाषेचा |केलासे गौरव |
भवार्णवी नाव |उभारुनी ||४||
वि - म्हणजे काय ?
सर - म्हणजे आज जसे इंग्रजीच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले विद्वान मराठीची हेटाळणी करतात, विज्ञानाकरीता मराठी सक्षम नाही असं ठोकून देतात, तसे त्या काळातले संस्कृत विद्वान मराठी भाषेला छपणी म्हणजे नाटकवाल्यांची भाषा म्हणून हिणवीत. पण भवसागर तरुन जाण्याचा मार्ग ज्ञानदेवांनी मराठी भाषेत आणून छपणी समजण्यात येणाऱ्या मराठीचाच गौरव केला.
इंग्रजीला उच्च शिक्षणात पर्याय नाही, असं छातीठोकपणे जेव्हा, स्वतःला विद्वान समजणारे पंडित आज जेव्हा हिरिरीनं मांडतात, तेव्हा मला याचं हसू येत आणि ज्ञानदेवांच्या ह्या अफाट कर्तुत्वाच स्मरण होऊन त्या विद्वानांची कीवही येते
पूर्ण लेख वाचण्याकरिता खालील लिंक पहा.
https://goo.gl/FCYue7
〰〰〰〰〰〰〰
✒प्रा. मनोहर राईलकर
📧railkar.m@gmail.com
अशाच अभ्यासपूर्ण लेखांसाठी तुमचा whatsapp क्रमांक, खालील लिंकवर द्या.
https://goo.gl/qxuUBc
©मराठी शाळांचे शिलेदार
〰〰〰〰〰〰〰
➡संदेश पुढे पाठवा➡
